Latest upcoming new Marathi Film-Baap Loyk वडील आणि मुलगा यांचा भावनिक विषय मांडलेला आहे. रोजच्या जगण्यातील प्रतिबिंब आणि सामाजातील वास्तव यामध्ये पाहायला मिळणार आहे.
बऱ्याचदा, मुलगा स्वतः बाप होईपर्यंत त्याला आपल्या बापाचं बापपण कळत नाही आणि कधीकधी तर बाप गेल्यावरच त्याच्या मुलांना आपल्या बापाची महती जाणवते. या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेला आहे़. “बाप ल्योक” नावाचा मराठी सिनेमा हा एक सुखद आणि आनंददायक अनुभव आहे.
कथा-आगामी नवीन मराठी चित्रपट- बापल्योक हा मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट असून यात विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या आई-वडिलांसोबत गावात राहून शेतकरी म्हणून काम करण्यासाठी सागर हा तरुण आपली पुण्यातील नोकरी सोडून गावी आलेला असतो. अनेक प्रयत्न करून सागरचं लग्न ठरलंय. सागर लग्नासाठी उत्सुक. इतकं की, चोरून चोरून होणारी बायको मयुरीशी व्हिडिओ कॉल वर बोलतो. तिला जाऊन भेटतो. सागरचं तात्याशी मात्र पटत नाही. अशातच सागरच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याची जबाबदारी तात्यावर येऊन पडते.तात्याशी आधीच वाकडं असलेला सागर आधी बापासोबत पत्रिका वाटायला टाळाटाळ करतो. पण नंतर त्यालाच जावं लागतं.दोघे बापलेक बाईकवर आसपासच्या गावात त्यांच्या सग्यासोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात. आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हळुवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो.
कलाकार
सागर झालेला विठ्ठल काळे आणि तात्यांच्या भूमिकेतील शशांक शेंडे यांनी आपापल्या भूमिका अगदी नैसर्गिकरित्या वठविल्या आहेत. इतर सहकलाकारांनी देखील त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिलेली आहे.
संगीत
कर्णमधुर करणारं पार्श्वसंगीत आणि विशेषतः दोन्ही गाणी उत्तम जमून आली आहेत. गुरु ठाकूरने लिहिलेलं ” घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं” हे बापाची महती सांगणारं गाणं तर खासच झालं आहे.
अभिप्राय
फारसे काही ट्विस्ट, टर्न्स नसणारा, उपदेशाचे डोस न पाजता, कथेच्या ओघात बापाची महती सांगणारा, हसता-हसता डोळ्याच्या कडा ओलावणारा हा सिनेमा थिएटर मधे जाऊन पाहावा असाच आहे.
बापल्योक पाहताना प्रत्येकाला त्याचा बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेकरांबद्दल, कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बापल्योक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावीशी वाटेल, यात शंका नाही.